जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा एक वर्षाचा घरकर माफ; ग्रामसभेत ठराव एकमताने मंजूर.
प्रविण चिडे विरुर स्टेशन
महाराष्ट्र लाईव्ह पोर्टल न्यूज प्रतिनिधी
विरूर :- विरूर ग्रामीण भागातील शासकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विरूर ग्रामपंचायतीने एक अभिनव निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा एक वर्षाचा घरकर (घर टॅक्स) माफ करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.ग्रामीण भागातील पालकांनी खासगी शाळांऐवजी जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य द्यावे, शासकीय शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढावी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी या ठरावाचे उत्स्फूर्त स्वागत केले. शिक्षणासाठी ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरेल,अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.सरपंच अनिल आलाम म्हणाले,गावातील प्रत्येक मुलाला दर्जेदार आणि संस्कारक्षम शिक्षण मिळावे हा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे. पालकांनी जिल्हा परिषद शाळेवर विश्वास ठेवावा आणि मुलांना शासकीय शाळेत प्रवेश द्यावा, यासाठी घरकर माफीचा हा निर्णय घेतला आहे.भविष्यातही शिक्षणासाठी असेच लोकहिताचे निर्णय घेतलेजातील.मुख्याध्यापक टांगे सर म्हणाले, विरूर ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे पालकांना प्रोत्साहन मिळेल आणि जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशसंख्या वाढण्यास निश्चित मदत होईल. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.ग्रामसभेत मंजूर झालेला हा ठराव ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा देणारा ठरत असून, शिक्षण क्षेत्रात लोकसहभागातून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा विरूर ग्रामपंचायतीचा हा उपक्रम जिल्ह्यासाठी आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







