“सुपीक जमीन वाचवा, MIDC हद्दपार करा” डॉ. कुमार पोहनकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन…!
गोंडपिपरी :- तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसीसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला १२ गावांतील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. “सुपीक जमीन वाचवा, एमआयडीसी हद्दपार करा, शेतजमीन देणार नाही” अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहाय्यक सचिव, केंद्रीय मानवाधिकार संघटक (नवी दिल्ली) डॉ. कुमार यादवराव पोहनकर यांनी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर केले.व या शासनाच्या भूमिकेचा तीव्र विरोध करण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, भूसंपादनाच्या नोटिसा मिळालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवरच अवलंबून असून संबंधित जमीन ही त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. ही जमीन संपादित झाल्यास हजारो कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळेल, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन उदरनिर्वाह धोक्यात येईल. त्यामुळे ही कारवाई शेतकऱ्यांच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारावर थेट आघात करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.निवेदनात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४ आणि २१ चा उल्लेख करत, शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर व पुनर्वसनावर कोणताही सखोल सामाजिक किंवा आर्थिक अभ्यास न करता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच “न्याय्य नुकसानभरपाई व भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम-२०१३” मधील तरतुदींनुसार बहुफसली व सिंचनयुक्त सुपीक जमीन संपादित करणे टाळावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शासनाने प्रथम शासकीय, पडीत किंवा कमी उत्पादक जमिनींचा पर्याय तपासण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत हा निर्णय अन्यायकारक व मनमानी स्वरूपाचा असल्याचे डॉ. पोहनकर यांनी म्हटले आहे.शेतकरी विकासाला विरोध करत नसून, विकासाच्या नावाखाली त्यांना भूमिहीन व बेरोजगार करणे अमान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. योग्य पुनर्वसन, पर्यायी उपजीविका आणि सामाजिक सुरक्षा यांची हमी दिल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया थांबवून शासनाने सुपीक शेती अधिग्रहित करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.याप्रसंगी शेतकरी एकता समितीचे राजेश कवठे, माधव लडके, अतुल झाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.







