‼️कडबा-कुटार व जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर‼️
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀गोंडपिपरी प्रतिनिधी :- शरद कुकुडकार
गोंडपिपरी :गावातील नागरिकांच्या सोयीसाठी शासनाच्या निधीतून विविध विकासकामे केली जात असली, तरी संबंधित सुविधांचा योग्य वापर होत नसल्याने लाखो रुपयांचा शासकीय निधी वाया जात असल्याचे चित्र गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे पाहायला मिळत आहे. सुमारे १५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेले बाजारओटे सध्या वापराविना पडून असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे सार्वजनिक उपयोगासाठी उभारण्यात आलेली ही सुविधा आता केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गावातील आठवडी बाजारात येणारे व्यापारी, शेतकरी तसेच नागरिकांना सुविधा मिळावी, या उद्देशाने बाजारओट्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचा नियमित व प्रभावी वापर सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही वास्तू सध्या ओसाड पडली आहे.बाजारओट्याचा वापर कडबा-कुटारासाठी!बाजारओट्याचा अपेक्षित वापर होत नसल्याने काही नागरिकांकडून त्याचा वापर कडबा, कुटार तसेच बैल आणि इतर जनावरांचा चारा ठेवण्यासाठी केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सार्वजनिक उपयोगासाठी उभारण्यात आलेल्या बाजारओट्यांची अशी अवस्था झाल्याने शासनाच्या निधीच्या विनियोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.ग्रामपंचायतीने बाजारओट्याचा योग्य वापर सुरू करून व्यापारी व नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच या बांधकामासाठी खर्च झालेल्या निधीचा योग्य विनियोग झाला आहे की नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणीही पुढे आली आहे.गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करावीग्रामपंचायतीच्या कारभारावर देखरेख ठेवणाऱ्या संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी बाजारओट्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्याच्या वापराबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सार्वजनिक सुविधेचा नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळणार की ती अशीच पडून राहणार, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.







