धाबा ग्रामपंचायतीच्या ऑडिटमध्ये २० लाखांहून अधिक रकमेची कायदेशीर वसुली प्रलंबित?
तीन महिने उलटूनही संबंधितांवर कारवाई नाही; ग्रामस्थांनी BDO कडे चौकशी व कठोर कारवाईची मागणी.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
शरद कुकुडकार प्रतिनिधी:- गोडपिपरी
गोडपिपरी :- ग्रामपंचायत धाबा येथील आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या लेखापरीक्षण (ऑडिट) अहवालात सुमारे २० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची कायदेशीर वसुली (Recovery) दर्शविण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ऑडिट अहवाल प्राप्त होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही संबंधित जबाबदार व्यक्तींवर अथवा ग्रामपंचायत स्तरावर अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर किंवा प्रशासकीय कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.याबाबत धाबा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती गोंडपिपरी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.निवेदनानुसार, ग्रामपंचायत धाबाच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या लेखापरीक्षण अहवालामध्ये सुमारे २० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची कायदेशीर वसुली दाखविण्यात आली आहे. मात्र, ऑडिट अहवाल प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटूनही संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध वसुली किंवा प्रशासकीय कारवाई झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.जनतेचा कर आणि शासनाच्या निधीशी संबंधित गंभीर बाब असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वेळेत कारवाई न झाल्यास संबंधित प्रकरणाला पाठीशी घातले जात असल्याची शंका नागरिकांमध्ये निर्माण होऊ शकते, अशी भूमिकाही ग्रामस्थांनी मांडली आहे.त्यामुळे ग्रामपंचायत धाबा येथील २०२४-२५ च्या ऑडिट रिपोर्टमधील प्रलंबित वसुलीची तातडीने चौकशी करून दोषींवर नियमानुसार कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, तसेच संबंधित रकमेची वसुली करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी BDO यांच्याकडे केली आहे.आता पंचायत समिती प्रशासन या तक्रारीवर कोणती भूमिका घेते आणि ऑडिटमध्ये नमूद रकमेची प्रत्यक्ष वसुली कधी होते, याकडे धाबा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.







