🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀प्रविण चिडे विरुर प्रतिनिधी
📱मो.8805155133
विरूर :गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आयोजित ग्रामसभेतच ग्रामपंचायतीच्या सरपंचाला कथित धक्काबुक्की,शिवीगाळ आणि अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागल्याची घटना विरूर येथे घडली.एवढेच नव्हे तर ग्रामसभेतून पळून गेल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करून आपली बदनामी केल्याचाही आरोप सरपंच अनिल बंडू आलाम यांनी केला आहे. या प्रकरणी विरूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अनिल बंडू आलाम (वय ३६), रा.विरूर ता.राजुरा, हे विरूर ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत.त्यांच्या तक्रारीनुसार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास जिल्हा परिषद तेलुगू प्राथमिक शाळेच्या पटांगणात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातील ललितकुमार सोनी यांनी ग्रामपंचायतीच्या लेखाजोख्याबाबत प्रश्न उपस्थित केला.त्यावर संबंधित लेखाजोखा ग्रामसेवकांकडे असून ते संपावर असल्याने परतल्यानंतर संपूर्ण माहिती देण्यात येईल,असे सरपंच आलाम यांनी सांगितले.मात्र,या उत्तरावरून संस्कार मारोती निम्मलवार (वय २४) रा.विरूर हा आपल्याकडे धावत आला.त्याने उद्धटपणे बोलत धक्काबुक्की केली आणि हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला असा आरोप सरपंचांनी तक्रारीत केला आहे.यावेळी राजीनामा देण्याची मागणी करत अश्लील शिवीगाळ करण्यात आली. ग्रामपंचायतीचे कामकाज आणि नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना आपल्याशी गैरवर्तन करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.या घटनेनंतर त्याच रात्री रौनक रामअवतार सोनी (वय २४) रा.विरूर याने संस्कार निम्मलवार याच्यासोबत संगनमत करून आपली बदनामी करण्याच्या उद्देशाने ग्रामसभेतून पळून गेल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर टाकल्याचा आरोपही सरपंच आलाम यांनी केला आहे.ग्रामसभेसारख्या लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचे प्रश्न मांडणे आणि त्यांची उत्तरे देणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या वर्तनामुळे लोकप्रतिनिधींच्या सन्मानाचा आणि शासकीय कामकाजाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी सरपंचांनी विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.विरूर पोलिसांनी १९ ऑक्टोबर रोजी संस्कार मारोती निम्मलवार आणि रौनक रामअवतार सोनी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९६, ३५६(२) आणि २२१ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.पुढील तपास विरूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड करीत आहेत.








