सात किलोमीटरच्या मार्गावर तब्बल १७ खड्डे..!
‼️राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा प्रवास‼️
महामार्ग विभागाचे दुर्लक्ष, करंजीकरांचा आंदोलनाचा इशारा.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀शरद कुकुडकार :- प्रतिनिधी गोडपिपरी🌀
गोंडपिपरी : चंद्रपूर-अहेरी राष्ट्रीय महामार्गावरील करंजी ते गोंडपिपरी या अवघ्या सात किलोमीटरच्या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, या अंतरात तब्बल १७ मोठे खड्डे पडल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील खड्डे आणि भेगांमुळे वाहनचालकांसह शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गंभीर परिस्थिती असूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.चंद्रपूर-अहेरी मार्गावर सुरजागड येथून मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची तसेच अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक होत असल्याने महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर भेगा पडल्या असून, मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.करंजी ते गोंडपिपरी या सात किलोमीटरच्या मार्गावर तब्बल १७ खड्डे असल्याने वाहनचालकांना सतत कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी हा धोका आणखी वाढतो. खड्डे चुकविताना वाहने समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण होत असून, गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, या मागणीसाठी सोमवारी (दि. ५) गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि ठाणेदार यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन देण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समीर निमगडे, सामाजिक कार्यकर्ते राकेश चापले, बादल देऊरमल्ले, सुधांशु चिचघरे, अंबादास वासेकर, मयूर पोहोनकर, सुरेश देवतळे आदी उपस्थित होते.तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.
सुरक्षारक्षक गेले कुठे?सतत वर्दळ असलेल्या या मार्गावर यापूर्वी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. भरधाव जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे तसेच वाहनचालकांना दिशादर्शक सूचना देणे, यासाठी हे सुरक्षारक्षक कार्यरत होते. मात्र आता हे सुरक्षारक्षक दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी महामार्गावर पुन्हा सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः बुजविला खड्डा!पोलीस म्हटले की खाकी वर्दीतील कडक अधिकारी, अशी सर्वसामान्यांची भावना असते. मात्र गोंडपिपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एका पोलिस कर्मचाऱ्याने या मार्गावरील खड्डा स्वतः बुजविल्याचे आश्चर्यकारक आणि संवेदनशील चित्र पाहायला मिळाले. ज्या कामाची जबाबदारी महामार्ग विभागाची आहे, ते काम पोलिस कर्मचाऱ्याला स्वतः करावे लागते, तर महामार्ग विभाग नेमके करतो तरी काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
देखभाल-दुरुस्तीची यंत्रणा करते तरी काय?काही वर्षांपूर्वी बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बामणी ते नवेगाव वाघाडे या राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले. मात्र सद्यस्थितीत या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. खड्डे बुजविण्याबरोबरच रस्त्याच्या गुणवत्तेची आणि अवजड वाहतुकीमुळे होणाऱ्या नुकसानीचीही तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.







