बैलामुळे वाघाचा डाव फसला; महिलेचा जीव थोडक्यात बचावला, जखमी महिलेवर गोंडपिपरीत उपचार सुरू.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀शरद कुकुडकार :- गोंडपिपरी प्रतिनिधी
गोंडपिपरी :- तालुक्यातील चेक सोमणपल्ली शिवारात वाघाने महिलेवर झडप घालून हल्ला केल्याची थरारक घटना समोर आली आहे. शेतातून घराकडे परतत असताना अचानक वाघाने महिलेवर हल्ला केला. मात्र, सोबत असलेल्या बैलांनी प्रसंगावधान राखून वाघाला प्रतिकार केल्याने महिलेचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रोजा शिवमोहन उराडे या महिला शेतातून घराकडे परतत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. वाघाने महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला घाबरल्या. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या बैलांनी वाघाच्या हालचालीला प्रतिकार केल्याने वाघाचा हल्ला फसला.या झटापटीत रोजा उराडे या जखमी झाल्या असून त्यांना तातडीने गोंडपिपरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. शेतशिवारात वाघाचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाकडून घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वाघाचा माग काढण्यासाठी तसेच त्याचा परिसरातील वावर निश्चित करण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.या घटनेमुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी, महिला व मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाघाचा वावर असलेल्या भागात नागरिकांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे, विशेषतः सकाळी व सायंकाळच्या वेळी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.बैलांच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचल्याची चर्चा परिसरात होत असून, या थरारक घटनेने चेक सोमणपल्ली परिसर हादरला आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







