SIR प्रक्रियेवर काँग्रेसचे गंभीर आरोप; मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या चौकशीची मागणी.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀शरद कुकुडकार प्रतिनिधी / गोडपिपरी
गोंडपिपरी : विशेष गहन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजुरा येथे आंदोलन केले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.SIR प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदार यादीतील बदल आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबत काँग्रेसने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची मागणी केली. तसेच ज्ञानेश कुमार यांना पदावरून बडतर्फ करून कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.या आंदोलनासाठी काँग्रेसने द इंडियन एक्स्प्रेसच्या अलीकडील तपासणी अहवालाचा संदर्भ दिला. या अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील १० महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले आहेत. या आक्षेपांमध्ये Form-6 मधील बदल, SIRदरम्यान मतदारांची नावे वगळणे व पुनर्स्थापित करणे तसेच मतदार यादीच्या IT प्रणालीच्या केंद्रीकरणाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश असल्याचे अहवालात नमूद आहे.काँग्रेसने या मुद्द्यांच्या आधारे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत मतदारांच्या हक्कांवर परिणाम होत असल्याचा आरोप केला. दरम्यान, निवडणूक आयोगाने २६ सप्टेंबरनंतर काही आक्षेपांवर निर्णय जाहीर केले असून, काही मुद्द्यांवर अद्याप स्पष्टीकरणाची आवश्यकता असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसने नमूद केले आहे.आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदाताई जेनेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, कामगार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







