शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तालुका काँग्रेसचा तहसील कार्यालयावर एल्गार; योजना सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀शरद कुकुडकार प्रतिनिधी:- गोडपिपरी
गोंडपिपरी : १९९५ मध्ये उभारण्यात आलेली सोनापूर-टोमटा जलसिंचन योजना परिसरातील हजारो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी योजना होती. काही काळ ही योजना सुरू राहिल्यानंतर शासनाच्या दुर्लक्षामुळे ती बंद पडली. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न बनला आहे.सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिके संकटात असताना बंद पडलेली जलसिंचन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर सोनापूर-टोमटा जलसिंचन योजना तातडीने सुरू करण्यासाठी गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेतली आहे.तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक भाऊ रेचनकर यांच्या पुढाकाराने शेकडो शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते एकत्र येत तहसील कार्यालयावर एल्गार करण्यात आला. यावेळी जलसंपदा विभागाने तातडीने योजनेची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती, पुनर्बांधणी व इतर तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात. तसेच योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शासनाकडे ठोस प्रस्ताव सादर करून त्याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
“शेतकऱ्यांना आश्वासन नको, पाणी हवे!”
अशी भूमिका मांडत वर्षानुवर्षे बंद असलेली सिंचन योजना केवळ कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्षात सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि त्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन निर्णायक कार्यवाही करावी, अशी मागणी तालुका काँग्रेसकडून करण्यात आली.योजनेच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांसह गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक भाऊ रेचनकर, देविदास भाऊ सातपुते, राजू चंदेल, धीरेंद्र भाऊ नागापुरे, महेंद्र भाऊ कुनघाटकर, राजू राऊत, बालाजी भाऊ चनकापुरे, दिलीप पुलगमकर, राहुल लडके, अशोक राऊत, पुरुषोत्तम चौधरी, दीपक ठेंगरे, रामदास वाघाडे, सुदर्शन मानकर तसेच अनेक शेतकरी व काँग्रेस समर्थित कार्यकर्ते उपस्थित होते







