आमच्या पैशाचा वापर; हजारो कोटींची कर्जमाफी मात्र भांडवलदारांसाठी.!
डॉ. राजरत्न आंबेडकर यांचा सरकारच्या आर्थिक धोरणांवर घणाघात; समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वतःच्या बँकांची निर्मिती करण्याचे आवाहन.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀शरद कुकुडकार गोडपिपरी :- प्रतिनिधी
गोंडपिपरी :- देशातील मोठमोठ्या उद्योगपतींची हजारो कोटी रुपयांची कर्जे माफ केली जात असताना सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा उपयोग मात्र जनतेच्या विकासासाठी कितपत होत आहे, असा सवाल उपस्थित करत ‘आमचा पैसा, आम्हीच भागीदार’ या तत्त्वावर समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे आणि डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले.भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा गोंडपिपरीच्या वतीने ११ ऑक्टोबर रोजी गोंडपिपरी येथील लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी समाजाच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले.
समाजाच्या पैशाचा समाजाच्या विकासासाठी वापर व्हावा.!
देशातील विविध महत्त्वाच्या बँकांच्या माध्यमातून मोठमोठ्या उद्योगपतींची हजारो कोटी रुपयांची कर्जे माफ केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी सर्वसामान्यांच्या आर्थिक हक्कांबाबत जागरूक होण्याची गरज व्यक्त केली. आपल्या पैशाचा उपयोग आपल्या समाजाच्या विकासासाठी झाला पाहिजे. त्यासाठी समाजाने केवळ आर्थिक व्यवहारांचा भागीदार न राहता आर्थिक व्यवस्थेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.समाजाचा आर्थिक विकास साधायचा असेल, तर स्वतःच्या आर्थिक संस्था उभारण्याबाबत गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. बँकिंग आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून समाजबांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी सामूहिक पुढाकार आणि आर्थिक सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थितीया
महासभेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव राहुल शेंडे, नागपूर विभागीय अध्यक्ष आकाश चौरे, जिल्हाध्यक्ष आनंद वनकर, वैधमापनशास्त्र अधिकारी रूपचंद फुलझेले, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णमाला भगत आणि अमावस्या निमसरकार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा ज्येष्ठ साहित्यिक उद्धव नारनवरे यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या आर्थिक विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाच्या प्रगतीसाठी आर्थिक स्वावलंबनाची दिशा स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
रॅलीने वेधले लक्ष
डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे गोंडपिपरी येथे आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून कार्यक्रमस्थळापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये समता सैनिक दलाच्या पथकाचा सहभाग होता. त्यानंतर लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात महासभेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद वनकर यांनी केले, तर बुद्ध विहार समन्वयक आयु. समर्थ भसारकर यांनी आभार प्रदर्शन केले.
आर्थिक स्वावलंबनासाठी एकजुटीचा संदेश
समाजाचा आर्थिक विकास साधायचा असेल, तर केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे, असा सूर या महासभेतून उमटला. स्वतःच्या आर्थिक संस्था उभारणे, आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग वाढवणे आणि समाजबांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.







