शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
✍️मुख्य संपादक संतोष उत्तम झाडे
ब्रम्हपुरी :- भारतीय लोकशाहीसाठी ८ ऑक्टोबर हा ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्याच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आवाहनाला प्रतिसाद देत ब्रम्हपुरी तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने ब्रम्हपुरी शहरातील शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीचे खासदार निवडणूक आयोगाकडे उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी शांततेत जात असताना त्यांना अडविण्यात आले. काॅंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच ‘इंडिया’ आघाडीच्या अन्य खासदारांशी पोलिसांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा, त्यांच्यावर लाठीमार करण्यात आल्याचा आणि काही नेत्यांना दुखापत झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि जनतेच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींवर झालेली कारवाई हा संविधानावरील हल्ला असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसने ८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन केले.दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उत्तरदायित्व निश्चित करण्यासह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविले जात नाही आणि निवडणूक व्यवस्थेची निष्पक्षता पूर्णपणे बहाल होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरू ठेवण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.यावेळी तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, सेलचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी, ग्राम काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.







