नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज – चंद्रपूर येथे आढावा बैठकीत विजयाचा निर्धार.
✍️मुख्य संपादक :- संतोष उत्तम झाडे
📱मो.नंबर – 9730526497
चंद्रपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला असून, पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम केल्यास या निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. चंद्रपूर येथे आयोजित पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवडणुकीची रणनीती, मतदार नोंदणी, संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही केवळ एका उमेदवाराच्या विजयाची लढाई नसून, सुशिक्षित तरुणांचे प्रश्न, बेरोजगारी, रोजगाराच्या संधी, शिक्षणव्यवस्था आणि पदवीधरांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची संधी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे. पक्षाची विचारधारा आणि जनतेच्या प्रश्नांशी असलेली बांधिलकी पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे आवाहन आ. वडेट्टीवार यांनी केले.आयोजित आढावा बैठकीस काँग्रेस नेते विनाायक बांगडे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष शिवा राव, सेवादल जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल, अंबिका प्रसाद दवे, महानगरपालिका गटनेते सुरेंद्र अडबाले, प्रवीण पळवेकर प्रमोद बोरीकर दिनेश चोखारे राजेश कडूर राजू रेड्डी, नरुले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीमध्ये विजय मिळविण्यासाठी केवळ राजकीय वातावरण अनुकूल असून चालत नाही, तर बूथस्तरापासून पक्षाची मजबूत यंत्रणा उभी करावी लागते. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपली जबाबदारी ओळखून मतदारांशी थेट संपर्क साधावा. पदवीधर मतदारांची नोंदणी, मतदार यादीची पडताळणी, नव्या मतदारांपर्यंत पोहोचणे आणि काँग्रेसची भूमिका प्रभावीपणे मांडणे या बाबींना प्राधान्य द्यावे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.काँग्रेसमध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची परंपरा आहे. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून पक्षाच्या विजयासाठी एकदिलाने काम केल्यास कोणतेही आव्हान मोठे नाही. कार्यकर्त्यांची एकजूट आणि संघटनात्मक ताकद हीच काँग्रेसची खरी शक्ती आहे. तर नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीच्या तिकीटवाटपावरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसने संघटनात्मक तयारीवर भर देत पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जावे आणि विरोधकांच्या राजकीय घडामोडींपेक्षा स्वतःच्या संघटनात्मक ताकदीवर लक्ष केंद्रित करावे, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच नागपूर पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांनी विधानमंडळात पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्याची बाबही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते. शिक्षण, रोजगार, बेरोजगार तरुणांच्या समस्या आणि पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर सभागृहात आवाज उठविण्याची त्यांची भूमिका काँग्रेससाठी महत्त्वाचा मुद्दा ठरू शकते.पदवीधर मतदारांना केवळ निवडणुकीपुरते आश्वासन न देता त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व देणे आवश्यक आहे. विधानमंडळात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या प्रतिनिधींची भूमिका मतदारांसमोर प्रभावीपणे मांडणे, तसेच पदवीधरांच्या अपेक्षा आणि समस्यांचा आढावा घेणे, यावर काँग्रेसने भर देण्याची गरज असल्याचेही विधीिमंडळपक्षनेते आ विजय वडेट्टीवार म्हणाले. याप्रसंगी प्रामुख्याने काँग्रेस पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







