
महाराष्ट्र लाइव न्यूज़
प्रतिनिधि प्रमोद दुर्गे
गोडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील एका गंभीर प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. घरात जबरदस्तीने प्रवेश करणे, मालमत्तेची नासधूस, चोरी तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार संबंधित कुटुंबाने केली आहे.
या प्रकरणी अशोक फरीदा मेश्राम यांनी संबंधित पोलिसांकडे तक्रार अर्ज, जबाब तसेच आवश्यक कागदपत्रे सादर केल्याचे सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती देत निवेदन सादर केले.
पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, निवेदनाची दखल घेत पालकमंत्र्यांनी संबंधित पोलिसांना प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही धाबा उपपोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी गोंडपिपरी न्यायालयातही पाठपुरावा करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने पीडित कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे.
“आमच्यावर अन्याय झाला आहे. तक्रार, जबाब, निवेदन आणि वरिष्ठांकडे पाठपुरावा करूनही गुन्हा दाखल होत नसेल तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे जावे?” असा सवाल पीडित कुटुंबाने उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पीडित कुटुंबाने प्रशासनाकडे केली आहे.





