शेकडो ग्रामस्थांची पंचायत समितीवर धडक; पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀गोंडपिपरी प्रतिनिधी – शरद कुकुडकार
गोंडपिपरी :- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील मौजा चेक नांदगाव येथे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी आज गोंडपिपरी येथील पंचायत समिती कार्यालयावर धडक देत आपली नाराजी व्यक्त केली.गावातील सध्याच्या पाणीपुरवठा योजनेतून मिळणारे पाणी अपुरे पडत असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून सुमारे ५०० फूट खोल बोअरवेल तयार करण्यात आली. मात्र, पाण्याची पातळी खालावल्याने आणि पंप मशीनच्या खोलीबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पाणीपुरवठा बंद पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाण्याचा स्रोत उपलब्ध असूनही गावकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.या समस्येबाबत ग्रामपंचायत सचिव व प्रशासक यांना वारंवार सूचना करूनही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, गावातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढली आहे.पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणीबोअरवेलमधील पंप मशीनची तांत्रिक तपासणी करून ती योग्य खोलीवर बसवावी, पाणीपुरवठा विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी आणि गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. तसेच, ग्रामस्थांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.जंगलालगत वसलेल्या चेक नांदगावमध्ये विहिरींना पुरेसे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांची भिस्त बोअरवेलवर आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता ठोस पावले उचलण्याची गरज आहे.आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष पाणीपुरवठा महत्त्वाचा असून, चेक नांदगावचा पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.आता प्रशासन यावर कोणती कार्यवाही करते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.








