सणासुदीच्या दिवसांत सात गावांतील नागरिकांची पाण्यासाठी वणवण; नळांना पाणी येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त.
✍️मुख्य संपादक :- संतोष उत्तम झाडे
गोंडपिपरी :- तालुक्यातील विठ्ठलवाडा येथून राबविण्यात येणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पुरवठा मागील चार दिवसांपासून ठप्प झाल्याने परिसरातील जवळपास सात गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सणासुदीचे दिवस सुरू असताना नळांना पाणी येत नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून, पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.शासनाच्या ‘हर घर नल, हर घर जल’ या संकल्पनेतून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचावे, या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून गावागावांत नळजोडणी करण्यात आली. यामुळे नागरिकांना घरबसल्या पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ही योजना वारंवार विविध कारणांमुळे विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे. कधी तांत्रिक बिघाड, तर कधी अन्य कारणांमुळे पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी मिळविण्यासाठी इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात घरातील स्वच्छता, स्वयंपाक आणि इतर कामांसाठी पाण्याची अधिक गरज असताना नळांना पाणी येत नसल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गैरसोय होत आहे.लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा लाभ नियमितपणे मिळणार नसेल, तर या योजनेचा उपयोग काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पाणीपुरवठा वारंवार खंडित होण्याऐवजी त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन बंद असलेला पाणीपुरवठा पूर्ववत करावा, तसेच भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.








