आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून अड्याळ टेकडी येथे धम्म सोहळ्याचे आयोजन.
✍️मुख्य संपादक :- संतोष उत्तम झाडे
ब्रम्हपुरी :- भगवान गौतम बुद्धांच्या शांती, करुणा, मैत्री आणि सद्भावनेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथे ४ नोव्हेंबर रोजी थायलंडमधील ११० बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत भव्य धम्मयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अड्याळ टेकडी परिसरात विपश्यना केंद्राची निर्मिती सुरू असून, या केंद्राच्या माध्यमातून धम्मविचारांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने आमदार विजय वडेट्टीवार यांनी थायलंडमधील बौद्ध भिक्खूंनी येथे यावे यासाठी पुढाकार घेत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या धम्मयात्रेत थायलंडमधील फ्रा अजह्न जारण, फ्रा महा चेतसादा आणि फ्रा अजह्न विचाई यांच्यासह ११० बौद्ध भिक्खू सहभागी होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भगवान बुद्धांच्या विचारांवर आधारित धम्मदेसना, सुत्त पठण, मैत्री संदेश आणि शांती प्रार्थना होणार आहे. या उपक्रमातून अहिंसा, बंधुता, करुणा आणि विश्वशांतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भिक्खूंचे आगमन व स्वागत होईल, तर दुपारी १.३० वा. चॅंटिंगला सुरुवात होणार आहे. अड्याळ (टेकडी) येथील विपश्यना केंद्राच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडणार असून, धम्मप्रेमी आणि बौद्ध अनुयायांसाठी हा विशेष आध्यात्मिक सोहळा ठरणार आहे.भगवान बुद्धांचा शांती, करुणा आणि मैत्रीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा तसेच निर्माणाधीन विपश्यना केंद्राला धम्मविचारांचे केंद्र म्हणून ओळख मिळावी, या हेतूने आयोजित या कार्यक्रमाला ब्रम्हपुरी तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार व युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांनी केले आहे.








