शिवसेना शिंदे गटाला बळ; राजकीय वर्तुळातून नियुक्तीचे स्वागत.
✍️संपादक :- संतोष उत्तम झाडे
गोंडपिपरी : शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची समिती मानली जाते. जिल्ह्यातील विविध विकासकामांचे नियोजन, निधीचे प्राधान्यक्रम आणि विकास योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात ही समिती महत्त्वाची भूमिका बजावते. अशा महत्त्वपूर्ण समितीवर बंडू भाऊ हजारे यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची भावना शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून बंडू भाऊ हजारे यांनी जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी काम केले आहे. त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी मिळाल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्यालाही नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, हजारे यांच्या नियुक्तीचे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रश्न, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते तसेच विविध विकासकामांना समितीच्या माध्यमातून प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बंडू भाऊ हजारे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती होणे ही शिवसेना शिंदे गटासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आणि ग्रामीण भागातील विकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडले जातील. या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.”- नितीन काकडे, तालुकाप्रमुख, शिवसेना शिंदे गट, गोंडपिपरी








