चेक तळोधी येथील दुर्दैवी घटना; शेतकरी चंपत ढपकस यांच्यावर दुःखाचा डोंगर.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
🌀प्रतिनिधी :- शरद कुकुळकर🌀
गोडपिपरी : शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असलेल्या बैल पोळ्याच्या दिवशीच चेक तळोधी येथे दुर्दैवी घटना घडली. विषारी सर्पदंशाने शेतकरी चंपत ढपकस यांच्या बैलाचा मृत्यू झाला. पोळ्याच्या दिवशी लाडक्या बैलाची पूजा करण्याऐवजी त्याच्या मृत्यूचे दुःख सहन करण्याची वेळ आल्याने ढपकस कुटुंबावर शोककळा पसरली आहे.शेतकरी चंपत ढपकस हे अल्पभूधारक असून शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे दोन बैल होते. घराजवळील गोठ्यात तणसाच्या ढिगाऱ्याजवळ चारा खाण्यासाठी बैलाला बांधून ठेवण्यात आले होते. याच तणसाच्या ढिगाऱ्यात दडून बसलेल्या विषारी सापाने बैलाला दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येईपर्यंत बैलाचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला.बैल पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालून सजवतात, शिंगांना रंग लावतात, पूजा करून गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. वर्षभर शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. मात्र, ढपकस कुटुंबाला यंदा पोळ्याच्या दिवशीच आपल्या लाडक्या बैलाला गमावण्याची वेळ आली.एका बैलाचा मृत्यू झाल्याने आता ढपकस यांच्याकडे केवळ एकच बैल शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतीची कामे आणि आर्थिक परिस्थिती याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. पोळ्याचा सण बैलाविनाच साजरा करण्याची वेळ आल्याने ढपकस कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी ढपकस कुटुंबाची भेट घेऊन दुःख व्यक्त केले. पोळ्याच्या आनंदाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने चेक तळोधी परिसरातही शोककळा पसरली आहे.







