मूलभूत सुविधा अन् निवासाची सोय नसलेल्या मानोरा आश्रमशाळेवर कारवाई करा..!
मानवधिकार पर्यावरण भ्रष्टाचार संघटनेचे कार्यकर्ते राहुल सोनटक्के यांची मागणी.
🌍महाराष्ट्र लाईव्ह न्युज🌍
✍️मुख्य संपादक :- संतोष उत्तम झाडे
गोंडपिपरी : जनकल्याण मागासवर्गीय शिक्षण संस्था, करंजीद्वारा चालविण्यात येणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप मानवधिकार पर्यावरण भ्रष्टाचार संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनटक्के यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या निवास, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित सुविधांची दुरवस्था असल्याने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद केली.मानोरा येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत गेल्या पंचवीस वर्षांपासून आश्रमशाळा सुरू असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले. मात्र, एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतरही विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था नसल्याचा त्यांचा आरोप आहे. वर्गखोल्यांमध्येच विद्यार्थ्यांना रात्री झोपावे लागत असल्याने त्यांच्या शिक्षणाबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले.शाळेतील स्वच्छतागृहांचीही अत्यंत दुरवस्था झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुला-मुलींसाठी असलेल्या शौचालयांची नियमित स्वच्छता होत नसून काही शौचालयांचे दरवाजेही तुटलेले आहेत. याच परिसरात विद्यार्थ्यांना कपडे धुणे व आंघोळ करावी लागत असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.शाळेच्या स्वयंपाकगृहाची परिस्थितीही समाधानकारक नसल्याचा आरोप आहे. स्वतंत्र व सुसज्ज किचनची व्यवस्था नसल्याने एका चुलीवर स्वयंपाक केला जात असल्याचे सांगण्यात आले. किचन परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.गेल्या पंचवीस वर्षांत या आश्रमशाळेसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे सांगत, हा निधी विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा व त्यांच्या भवितव्यासाठी योग्य पद्धतीने खर्च झाला का, याची चौकशी करण्याची मागणी राहुल सोनटक्के यांनी केली. गेल्या पंचवीस वर्षांतील निधी, खर्च व लेखापरीक्षणाचा संपूर्ण हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली.विद्यार्थ्यांना योग्य निवास, स्वच्छता व आरोग्य सुविधा न मिळणे हा त्यांच्या मानवी हक्कांशी संबंधित गंभीर विषय असल्याचे सोनटक्के यांनी म्हटले. शासनाने आश्रमशाळेची तातडीने चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. चौकशी पूर्ण होऊन निधीचा हिशोब सार्वजनिक होईपर्यंत शाळेची मान्यता स्थगित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.







